जळकोट तालूका प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात पालम येथील रईस खुरेशी यांच्या भाऊ जळकोट शहरात आपल्या नातेवाईकांकडे राहत होता. मध्यंतरी, आपल्या मुळ गावी पालमकडे जात असताना जळकोट शहरात रस्त्यावर त्याला विवो कंपणीचा सुमारे २६ हजार रुपयाचा मोबाईल सापडला होता. कोरोना कालावधीत प्रवास बंद असल्याने व अधिकचे पर्याय समोर उपलब्ध नसल्याने संबंधित तरुणाला जळकोट कडे प्रवास करता आला नव्हता. परंतू, प्रवासाची शिथिलता मिळाल्यानंतर त्याने पून्हा एकदा जळकोट गाठले असून संबंधित मोबाईल मधील क्रमांकाला संपर्क साधत, मुळ मोबाईल मालकाचा पत्ता शोधून मोबाईल त्यांच्या सुपूर्द केला आहे. रईस खुरेशी च्या प्रामाणिकतेचे सर्वत्र कौतूक होत असून जळकोट पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक गणेश सोंडारे यांनी त्याचा पुष्पहार घालून सत्कार केला आहे.
अधिक माहिती अशी कि, जळकोट येथील पत्रकार संगम डोंगरे यांचा विवो कंपनीचा मोबाईल तीन महिन्यापूर्वी रस्त्यावर हरवला होता. त्यानंतर त्यांनी त्याची लेखी तक्रार पोलिसात दिलेली होती. परंतु, अद्याप तपास लागला नव्हता. मात्र, सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संगम डोंगरे यांना एका अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला व आपला हरवलेला मोबाईल माझ्याकडे आहे आणि तो देण्यासाठी मी पालम वरुन जळकोटला आलो आहे असा आवाज आला. त्यानंतर पत्रकार डोंगरे यांनी सदरिल तरुणास घरी बोलावून त्याची भेट घेतली व मोबाईल सहीसलामत आणून दिल्याबद्दल त्याचे आभार मानले. त्याच, दरम्यान त्यांनी पोलिसात मोबाईल सापडला असल्याचेही कळविले. आणि रईस खूरेशी च्या प्रामाणिकतेचे कौतूक पोलिसांनाही वाटले व त्यांनी संबंधित तरुणाला व पत्रकार डोंगरे यांना पोलिस स्टेशनला बोलावून सत्कार केला आहे.
यावेळी, पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्यासह पत्रकार संगम डोंगरे, एमआयएमचे शहराध्यक्ष मुस्तफा बागवान, अहमद लाटवाले, नौशीद खॉ पठान, अजिम बागवान, पो.कॉ. गणेश माळवदे, नरेश उस्तुरर्गे, राहूल वडारे, रामदास राठोड, गायकवाड आदी उपस्थित होते. सदरील सत्कारानंतर प्रामाणिक तरुण, तसेच सलमान खान मित्रमंडळा चे पालम शहराध्यक्ष पदावर असलेले रईस खुरेशी वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.....