परभणी, प्रतिनिधी शफीक तंबोली : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मंगळवारी (दि.29 जून) सकाळी साडेदहा वाजता परभणी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. तीर्थक्षेत्र त्रिधारा - उखळद - पिंप्री देशमुख या चौदा किलो मीटर अंतराच्या रस्त्याच्या भूमीपूजन समारंभास ते तीर्थक्षेत्र त्रिधारेस उपस्थित राहणार असून सकाळी 11 वाजता वसमत रस्त्यावरील सावली या विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ चव्हाण यांच्याहस्ते होणार आहे.
साडेआकरा वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार असून 12.45 मिनीटांनी ते सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठीच्या निवासी इमारतीच्या बांधकामाच्या भूमीपूजन समारंभास शनिवार बाजारात उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजता माजी खासदार अॅड. तुकाराम रेंगे पाटील यांच्या निवासस्थानी भेट देणार असून 2 वाजता ते आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी वसमत रस्त्यावरील राजयोग मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या परभणी व पाथरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. तेथून ते नांदेडकडे रवाना होणार आहेत.