औरंगाबाद सिल्लोड तालुक्यातिल उंडणगाव येथे शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली. या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी स्वतः महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उंडणगाव येथे पाडळे कुटुंबाच्या घरी जावून कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.
पाडळे कुटुंबाला स्वपदरची तसेच शासनाच्या वतीने आर्थिक मदत, कुटुंबातील मुलांना सरकारच्या वतीने शिक्षणाची सुविधा यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कुटुंबाला दिली.
घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून याबाबत पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासन घेईल. त्यासोबतच पीडित कुटुंबाला घरकुल, मुलांना जातीचे प्रमाणपत्र, अंत्योदय योजनेतून मोफत धान्य, बालगृह अशा विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. एखाद्या घरात कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाची वाताहत होते. सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून उंडणगाव येथील आत्महत्याग्रस्त कुटुंब स्वबळावर उभी राहावे. यासाठी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केल्या जाईल, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाडळे कुटुंबाला किराणा किट तसेच जीवनावश्यक वस्तू दिल्या याशिवाय स्वपदरची आर्थिक मदत देणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
*आत्महत्या हा पर्याय नाही*
सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यासाठी आत्महत्या हा पर्याय नाही असे स्पष्ट करीत शासन शेतकऱ्यांच्या खंबीर पाठीशी आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही अडचणी असल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात जेणे करून त्या समस्येची सोडवणूक करण्यात येईल. आत्महत्या मुळे आपल्या कुटुंबाचे प्रश्न सुटत नाहीत, उलट यात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, जि. प. माजी सभापती राजाराम पाडळे, माजी उपसरपंच शांतीलाल बसये, माजी सरपंच मोतीराम पाडळे, सय्यद जब्बार, दीपक चौथे, जगन पाटील, सय्यद नासेर, समाधान पाडळे यांच्यासह नायब तहसीलदार किरण कुलकर्णी, नायब तहसीलदार विनोद करमनकर, मंडळ अधिकारी राजाराम ससाणे,तलाठी विष्णू सोनवणे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर बोराडे आदिंची उपस्थिती होती.
*असे आहे कुटुंब*
सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून उंडणगाव येथील संतोष खंडू पाडळे ( 40 वय ) व संगीता संतोष पाडळे ( 32 वय ) या अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्याने बुधवार (दि.30) रोजी आत्महत्या केली. त्यांना जवळपास 6 लाख रुपयांचे कर्ज देणे होते. त्यांच्या पश्चात आई- शांताबाई खंडू पाडळे 70 वर्ष,
मुलगा- मानव संतोष पाडळे 10 वर्ष,
मुलगी- आरती संतोष पाडळे 12 वर्ष,
मुलगी -भारती संतोष पाडळे 14 वर्ष,
मुलगी-यशोदा संतोष पाडळे 8 वर्ष, व
मुलगी - दिव्या संतोष ( विवाहित ) वय 19 असे कुटुंब आहे. या कुटुंबातील शांताबाई यांच्याशी राज्यमंत्री सत्तार आणि जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले.